December 5, 2022
Job vs business in marathi

नोकरी सोडून बिझनेस करायचा विचार करताय?

मित्रांनो माझ्या इंस्टाग्राम पेज वर एक प्रश्न मला जवळपास एक ते दोन आठवड्याने विचारला जातो. तो म्हणजे, ‘मला माझ्या नोकरीचा कंटाळा आला आहे, मला माझी नोकरी सोडून व्यवसाय सुरू करायची इच्छा आहे पण त्या बद्द्ल काहीच माहीती नाही; तर त्यासाठी मला मार्गदर्शन करा‘.

मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती ही इतरांपेक्षा खूप वेगवेगळी असते आणि नेहमीच असणार, प्रत्येकाचे शिक्षण, त्याच्या अंगी असलेली कला, त्यांचे कौशल्य, घरातून असलेला सपोर्ट व पाठपुरावा, त्यांचं नेटवर्क आणि कॉंटेक्ट, त्यांची बुद्धिमत्ता, मेहनत करण्याची शारीरिक आणि मानसिक तयारी वेगळी असते. आणि म्हणून या प्रश्नाचं सरळ साधं सोपे उत्तर देता येणं खूप अवघड असतं.

बहुतेक वेळा मी असे प्रश्न टाळतो कारण त्यांना उत्तरच देत नाही, आणि नाहीये त्याला उत्तर. प्रत्येकाची केस समजुन घेऊन उत्तर देणे वेळेअभावी मुळीच शक्य होत नाही.

आणि म्हणूनच, आज या लेखामधून ढोबळमानाने जॉब सोडून व्यवसाय सुरू करण्याचा ठाम निर्णय घेताना कसा विचार करावा हे मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे.

कदाचित हे प्रश्न तुम्हाला घाबरवू शकतील, विचित्र वाटतील, हा लेख कदाचित तुम्हाला आवडणार नाही. पण उगाचच मोटिवेशनल बोलण्यात, पुड्या सोडण्यात मला अजिबातच रस नाहीये.

उद्योजक आणि जुगारी यांचा मध्ये एक फरक आहे. उद्योजकाला आपली रिस्क नक्की कोठे आहे, किती आहे हे माहिती असतं. वरील सर्व प्रश्नांमधून तेच सांगण्याचा मी कळकळीचा प्रयत्न केला आहे.

१. बिझनेस सुरु करण्यामागे तुमचं नेमकं मोटिव्हेशन काय आहे?

व्यवसाय करणं म्हणजे काय नऊ ते पाच नोकरी करण्यासारखं असं जर वाटत असेल तर तसे मुळीच नाहीये. व्यवसायामध्ये दिवस–रात्र एक होऊन जाते, मान पाठ एक होते.

सगळ्या प्रकारची कामं ही करावीच लागतात. टेबलवर आपोआप, आयते बसून काहीच मिळत नाही.

त्यामुळे तुमच्या व्यवसायाबद्दलची मनापासून तुम्हाला प्रेरणा किंवा इछा नसेल किंवा यशस्वी व्हायची आंतरिक तळमळ आणि भावना नसेल तर बिजनेस तुमच्यासाठी नाही हे मी आताच सांगून ठेवत आहे.

अर्थात नोकरी ही वाईट आणि व्यवसाय हा चांगला असं काही होत नाही.

नोकरीमध्ये आयुष्याचा बॅलन्स (वर्क लाईफ बॅलन्स) हा योग्य प्रकारे सांभाळता येतो. आर्थिक, मानसिक, भावनिक या सर्व गरजा नोकरीमध्ये थोड्याफार प्रमाणात पूर्ण करता येऊ ही शकतील.

व्यवसायामध्ये निदान सुरुवातीची काही वर्षे तरी वरील सर्वच गोष्टी मिळत नाहीत. कधी कधी आपण व्यवसायात लावलेले पैसे ही परत मिळायला (कॅपिटल रीपेमेंट) मारामार होते.

बऱ्याचदा स्वतःचे निर्णय स्वतः घेता यावेत यासाठी म्हणजेच मानसीक फ्रीडम साठी लोकांना व्यवसाय हा करावासा वाटतो.

परंतु नंतर ते आपल्याच व्यवसायात नोकरी करायला लागतात, जी खरंतर खूप दुख:द गोष्ट आहे. मित्रांनो, व्यवसायामध्ये कस्टमर हा आपला बॉस असतो.

आणि अनेक ग्राहक हे वेगवेगळ्या बॉसेस सारखे वागतात, नाकात दम करतात. विचार करा, तुमच्या आताच्या नोकरीत एक बॉस सांभाळताना तुम्हाला त्रास होत असेल, मानसीक स्वातंत्र्य हिरावल्यासारखं वाटत असेल तर व्यवसायात तुमचे काय होईल.

तेव्हा, तुमच्या व्यवसायाबद्दल, प्रॉडक्ट बद्दल जर तुम्हाला आत्मीयता, अभिमान असेल, ते तुमचं प्रेरणास्थान होते तर आणि केवळ तरच व्यवसायात जा.

केवळ पैसा बघून किंवा असं बॉसला वैतागून व्यवसाय सुरु करणे योग्य नाही आणि मी याचं समर्थनही करत नाहीये.

२. कधी विचार केला आहे का, की आपल्याला मार्केट चा अभ्यास का करावा लागतो?

तुम्ही ज्या बिजनेस मध्ये उतरत आहात त्या बाजारपेठेचा योग्य तो आणि संपूर्ण अभ्यास करा.

– नक्की ग्राहकांचा प्रश्न व समस्या काय आहेत?

– तो सोडवण्यासाठी मी काय करू शकेन

– सध्या जे लोक जर आपण करत आहोत त्याच व्यवसायात आहेत त्यांचे मुख्य प्रश्न काय आहेत?

– ते कोणत्या अडचणींना सामोरे जातात?

– ते खरचं आणि किती यशस्वी झाले? – किंवा ते (सारखे) अपयशी का होत आहेत?

– माझे स्पर्धक काय नवीन करत आहेत जे मी पण करू शकतो?

– मार्केट कोणत्या वेगाने बदलत आहे, काय काय नवीन येत आहे?

– भविष्यामध्ये कोणते बदल अपेक्षित आहेत आणि मी ते माझ्या व्यवसायात कसे वापरु शकेन?

– आणि त्यासगळ्यानुसार मला माझ्या उत्पादनांमध्ये किंवा सेवांमध्ये केव्हढा आणि किती बदल करता येणे शक्य आहे आणि कसा?

– साधारण किती वेळ या बिजनेस मध्ये जम बसविण्यासाठी जातो?

– त्याला किती गुंतवणूक आणि भांडवल लागते?

– ब्रेक इव्हन पॉईंट साठी किती ग्राहक मला मिळवावे लागतील? या सर्व प्रश्नांचा अगदी खोलात जाऊन अभ्यास करून बिजनेस प्लान बनवा.

३. तुम्हाला अपयशाची भीती वाटते का?

हजारो काय लाखों स्टार्टअप एका दिवसात सुरु होतात, आणि हजारो लाखों स्टार्टअप्स बंद देखील होतात एका दिवसभरात. जर अपयशाची भीती वाटत असेल तर व्यवसाय करणे आपल्या नशीबात नाही हे समजून घ्या.

संपूर्ण जगातून साधारणपणे पाच ते सात टक्के नवीन उद्योग हे चार वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी चालतात. त्यामुळे फेल्युअर चा रेट जरा जास्तच आहे हे कृपया डोक्यात ठेवावं. रिस्क आहे.

पहिल्याच प्रयत्नात बिझनेस सहसा यशस्वी होत नाहीत. साधारण तीन ते चार वेगवेगळे बिझनेसेस करून पाहिल्यानंतर, अनूभव घेतल्यावरच यशाचा फॉर्मुला सापडतो, ज्यात पण वेळेनूसार बदल करावे लागतात.

आणि तोपर्यंत अपयशाचा सामना करावा लागतो. अर्थात, थोडी भिती असलीच पाहिजे आणि भिती असणं हे महत्वाचे आहे.

कारण ही जी अपयशाची भिती आहे ना, तीच भितीच तुमच्याकडून जास्त मेहनत आणि जास्त स्मार्ट वर्क करून घेऊ शकते.

भिती तुम्हाला निराशाग्रस्त करत असेल तर वो तुम्हारे बस की बात नही असं समजून व्यवसायापासून दूर रहा आणि भिती तुम्हाला नवीन प्रयत्न करण्याची प्रेरणा, उत्साह देत असेल तर व्यवसाय जरूर करा.

४. तुमचा प्लॅन बी काय आहे?

नोकरी सोडल्यानंतर जेव्हा तुम्ही सुरू केलेला बिझनेस जर मनासारखा चालला नाही तर पुढे काय करणार असा प्रश्न नक्कीच पडतो.

आणि ते सहाजिकच आहे. तर त्याच्यासाठी दुसरा प्लान तयार पाहिजे. आपण व्यवसायाला यशस्वी होण्यासाठी किती वेळ गुंतविणार आहोत हे आधी मनाशी ठामपणे ठरवलं पाहिजे.

मी जेंव्हा नवीन व्यवसायाचा विचार केला किंवा म्हणा की सुरू केला, तेव्हा माझ्या घरच्यांनी थोडा विरोध केला. मध्यम पगाराची नोकरी सोडूनमी एका नवीनच क्षेत्रात व्यवसाय सुरू करणार होतो. म्हणून मी स्वतः समोर तीन वर्षांच लक्ष ठेवलं होतं.

तीन वर्षात मी नोकरीमध्ये कमवतोय तेवढं उत्पन्न कमावलं नाही तर मी पुन्हा नवी नोकरी शोधेन हे मी स्वतःला आणि माझा घरच्यांना सांगितला होतं. सुदैवाने ती वेळ आली नाही.

परंतु त्यासाठीची माझी तयारी मी केली होती. तसही मी आत्ता फ्रीलॅंसर आणि नोकरी दोन्ही सांभाळत आहे. तर सांगायचा मुद्दा असा की, तुम्ही देखील, वेळेचं टार्गेट ठेवून त्यानुसार प्लान बी बनविला पाहिजे असा मी तुम्हाला अवश्य सल्ला देईन.

५. खरचं उत्तम व्यवसाय कल्पनेच्या मागे धावायचं का?

बेस्ट बिझनेस आयडिया असं काहीच नसतं. ते सगळं भाबड्या मनाचे खेळ आहेत. तुम्ही बिझनेस सुरु करता, तो वाढविण्यासाठी किंवा त्याची ग्रोथ करण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना राबवता. त्यातली काही यशस्वी होतात तर काही फसतात. हे एकदम नॉरमल आहे.

असं करत करत, काय चालतंय, काय मला जमतंय, मार्केटला नक्की काय पाहिजे, आणि स्पर्धकांना काय देता येत नाही या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळायला लागतात. आणि मग तुम्ही बेस्ट बिझनेस आयडिया स्वतःच शोधता आणि सुरू करता.

६. तुम्हाला विक्री करता येते का?

जगातले बरेचसे बिझनेसेस उद्योजकांना ग्राहक मिळवता येत नाही म्हणून त्यावर कुलूप लागायची वेळ येते. विक्री करता येणे हा उद्योजकाचा धर्म म्हणा किंवा सर्वात आवश्यक गुण आहे.

विक्रीची कला अंगी बाणवल्या शिवाय उद्योग चूकूनही सुरू करू नका. त्याकरिता आपल्या फाऊल्या वेळामध्ये वा पार्ट टाईममध्ये आपल्याला आवडलेल्या क्षेत्रात विक्रीची नोकरी (सेल्स जॉब)करून बघा. ग्राहक आपल्याला बरेच काही शिकवून जातात.

सेल्समध्ये आपल्याला ते शिकता येतं. म्हणून तर, दुसऱ्यांचे प्रोडक्ट्स आणि सर्वीस विकून तर बघा. जर ते तुम्हाला जमत आहे असं वाटत असेल, तर तुम्हाला कॉंफिडंसआला असतो की तुम्ही व्यवसाय हा करू शकता. हा आत्मविश्वास तुम्हाला इतर कोणीही देऊ शकत नाही. तो तुमचा तुम्हाला स्वतःलाच मिळवावा लागणार.

७. तुमचा रन वे किती असणार हे तुम्हाला माहीत आहे का?

स्टार्टअप मध्ये रन वे हा एक परवलीचा शब्द आहे. बाहेरून येणाऱ्या गुंतवणुकीशिवाय, किंवा विक्री मधून येणाऱ्या पैशांशिवाय तुम्ही आणि तुमचा बिझनेस किती काळ तग धरून राहू शकतो किंवा चालू शकतो याला रन वे असं म्हणतात.

साधारण १६ ते २५ महिने पुरेल इतका रन वे तयार झाल्याशिवाय नोकरी सोडून व्यवसायात उतरू नका. काही सेवा व्यवसायांमध्ये सात ते आठ महिन्यांचा रन वे पुरेसा असतो. परंतु उत्पादन ( product) बिजनेस मध्ये किमान २० ते २४ महिने पुरेल इतका पैसा उभा करणे आवश्यक असेल.

मित्रांनो, कदाचित हे वरील प्रश्न खूप तुम्हाला घाबरवतील, हा लेख कदाचित तुम्हाला आवडणारही नाही. पण उगाचच मोटिवेशनल बोलण्यात मला अजिबातच रस नाही. उद्योजक आणि जुगारी यांचा मध्ये फरक असतो.

व्यवसाईकाला हे पक्का माहीत असतं की कुठे जास्त मोठा खड्डा आहे, आपण किती खोल उतरायचं आहे. उपरोक्त प्रश्न हे मी सगळे तुम्हाला हेच समजावण्याचा प्रयास केला आहे. या सगळ्याचा व्यवस्थीतपणे विचार करा आणि जोमाने कामाला लागा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link
Powered by Social Snap