Featured-Brands-Dont-Happen-Overnight

“ब्रॅण्ड” हा एका रात्रीत होत नाही.

ॲपल कंपनीचे सीईओ, संस्थापक टीम कूक असं म्हणतात की, “जेंव्हा तुम्ही खोलीत नसता तेंव्हा बाकीचे त्या खोलीमध्ये असलेले लोक तुमच्याबद्दल काय बोलतात; तो तुमचा ब्रॅण्ड आणि गुडविल”. या एका वाक्यातुन कितीतरी मोठा अर्थ अस्तित्वात आला आहे, हे तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल. अजून थोडे सोपे करून सांगायचं असल्यास, आपल्या पाठीमागे म्हणजेच आपण नसताना लोक आपल्याबद्दल म्हणजे आपल्या कंपनीबद्दल किंवा प्रॉडक्टबद्दल जे काही बोलतात, समजतात, लिहीतात किंवा रीव्हीयू देतात, ते म्हणजे आपला ब्रॅण्ड होय.

Brands dont happen overnight

आपण आपल्या संपुर्ण ग्राहकांच्या मनात आपल्याबद्दल नेमकी काय आणि कशी प्रतिमा निर्माण केली आहे? किंवा करत आहोत? याचा प्रत्येक व्यावसायिकाने किंवा उद्योजकानं सतत विचार केला पाहिजे. सगळं अगदी व्यवस्थित तपासून पाहिलं पाहिजे. आपल्या कंपनीच्या उत्पादनांची किंवा सेवेची गुणवत्ता ही सर्वोत्तम तर असायला हवीच आहे, पण त्याचबरोबर ग्राहकांचा आदर आणि विश्वासदेखील जपला गेला पाहिजे. आपलं नाणं हे इतकं खणखणीत असलं पाहिजे की, समोर असलेल्या कमालीच्या गर्दीतही (येथे व्यवसाय स्पर्धा असा अर्थसुद्धा तुम्ही घेऊ शकता) त्याचा आवाज
सगळीकडे घुमला गेला पाहिजे. मालाचा किंवा सेवेचा दर्जा आणि नाविन्य इतकं आश्चर्यजनक असायला हवे की ग्राहकांच्या मनावरती आपल्या ब्रॅण्डचा ठसा उमटला पाहिजे, आपला ब्रॅंड त्यांच्या मनात बिंबविला गेला पाहीजे. आणि हो, या गोष्टी काही एका रात्रीमध्ये होत नाहीत.

“ब्रॅण्ड” हा काय एका रात्रीत होत नसतो.

व्यवसायिकाला ही ग्राहक केंद्रित सेवा – उत्पादन व उत्कृष्ट क्वालिटी ही सिद्ध करावीच लागते. हल्ली हे शब्द इतके गुळगुळीत झालेत की कधी -कधी त्यातला मतितार्थ आणि खोली हरवत चालली आहे असंही आता वाटू लागले आहे. मात्र बलाढ्य ब्रॅण्डस याची खूप काळजी घेताना दिसून येत आहेत तसेच आपल्या सेवा व उत्पादनांचा हा वेगळेपणा ग्राहकांपर्यंत पोहोचवतात.

ग्राहकांशी होणारे कम्युनिकेशन वा बोलणे हे ग्राहकांच्या भाषेतच असावं. जाहिरातीच्या माध्यमातून, सेवा व उत्पादन वाढीसाठी ग्राहकांशी संवाद साधावा लागतो. जाहिरातीद्वारे सांगितली जाणारी माहिती वाचकांच्या, ग्राहकांच्या डोक्यावरून जाणार नाही आणि ती माहिती त्यांना संपूर्णपणे समजेल याची काळजी घ्यावी लागते. जर काही माहिती नाही समजली, तर त्याचा खूलासा करण्यात यावा. अश्याप्रकारे सहज – सोप्या अश्या पद्धतीनं आणि नेमकेपणानं आपला मेसेज, आपला वेगळेपणा व आपली वेगळेपणाची खासियत ग्राहकांना सांगणं गरजेचं असतं. सोपं करून सांगणं हे खरंतर सोपं नसतंच. त्यासाठी त्यातील माहीतगार व तज्ज्ञाची वेळोवेळी मदत घेत चला.

फक्त सगळ्यांच्या नजरेत येईल असा आकर्षक लोगो असणं म्हणजे ब्रॅण्ड होत नाही. जसं आकर्षक, सगळ्यांना हवे हवेसे कपडे घातलेली व्यक्ती गुणी असेलच असं नाही, किंबहूना त्याची खात्रीपण देता येत नाही. “ब्रॅण्ड” तयार करण्यासाठी इतरही खूप अश्या गोष्टी महत्वाच्या कार्यभाग साधतात. दिलेला शब्द आणि समोर दिलेलं वचन पाळणारी माणसंच मोठी होतात. अगदी तसंच, मान्य केलेली कमिटमेंट, समोर दिलेले वचन आणि विश्वास सार्थ करणारी उत्पादने – संस्था या ब्रॅण्ड होतात. मग त्यांच्या गुणांची चर्चा चार भिंतीच्या खोलीतच काय तर संपूर्ण जगात होते, ती पण अगदी अभिमानानं, आपलेपणानं…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *